“अखिलेश यांनी मला उत्तर प्रदेशमध्ये येण्यापासून १२ वेळेस रोखलं, आता मी आलो आहे” – असदुद्दीन ओवेसी

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. अखिलेश यादव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मला उत्तर प्रदेशमध्ये येण्यापासून १२ वेळेस रोखण्यात आलं होतं व २८ वेळा मला येण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आली होती, आता आलो आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा)चे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्यासोबत युती केली आहे. मी मैत्री निभवण्यासाठी आलो आहे. आम्ही दोघं यूपीमध्ये टक्कर देऊ, असं ओवेसींनी बोलून दाखवलं आहे. यानंतर ओवेसी जौनपूरकडे रवाना झाले.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष खासदार ओवेसी वाराणसीत पोहचले होते. विमानतळावर पोहचताच त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

यावेळी अखिलश यादव यांच्यावर निशाणा साधताना ओवेसींनी म्हटलं की,  त्यांना वाटतं लोकांनी गुलामासारखं राहून त्यांना मतदान करावं व अन्य कुणीही निवडणूक लढवू नये. मात्र, जेव्हा आम्ही कोणतीही निवडणूक लढवतो तेव्हा ती जिंकणं हाच आमचा उद्देश असतो.

जौनपूरनंतर मुस्लीमबहुल जिल्हा आझमगड आणि मऊ येथे देखील ओवसी व राजभर कार्यकर्त्यांसोबत बैठक करणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी शिवपाल यादव यांची देखील भेट घेतली होती. सुभासपा आणि आझाद समाजवादी पार्टीमध्ये चर्चा सुरू आहेत. अशावेळी ओवसींचे पूर्वांचलमधील आगमानामुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होतील, त्या अगोदर मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

२०१७ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपा व सुहेलदेव भारतीय समाज पार्टी यांच्यात आघाडी झाली होती. त्यानंतर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर ही आघाडी तुटली होती. यानंतर आता सुहेलदेव भारतीय समाज पार्टी नव्या जोडीदारांसोबत आपले राजकीय वजन पूर्वांचलमध्ये अधिक वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *