अजिंक्य रहाणे चतूर कर्णधार, शास्त्री गुरुजींनी केलं कौतुक

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या कसोटीत झालेला दारुण पराभव विसरत ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं. कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अजिंक्यच्या या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

या विजयानंतर प्रशिक्षक रवी शास्त्रींनी कर्णधार अजिंक्य रहाणेचं कौतुक केलंय. “रहाणे खूप चतूर कर्णधार आहे, त्याला सामन्याचं पारडं कुठे झुकतंय याचा अंदाज येतो. माझ्या मते त्याचा शांत स्वभाव नवोदीत खेळाडूंसाठीही फायदेशीर ठरला. उमेश दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतरही मैदानावर एका प्रकारे आत्मविश्वास दिसत होता.” सामना संपल्यानंतर झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत रवी शास्त्री बोलत होते.

यावेळी बोलत असताना शास्त्री यांनी विराट आणि अजिंक्यच्या कर्णधार शैलीतला फरक सांगितला. “हे बघा, दोघेही चांगले खेळाडू आहेत, दोघांनाही सामन्यात काय घडू शकेल याचा अंदाज येतो. विराट मैदानात आक्रमक असतो तर अजिंक्य शांत असतो…हा त्यांचा स्वभाव आहे. विराटच्या मनात असतं ते लगेच चेहऱ्यावर येत…पण अजिंक्य शांत राहून रणनिती आखतो. त्याला काय साध्य करायचं आहे हे त्याला माहिती असतं…म्हणूनच तो शांत राहून नेतृत्व करतो.” त्याचं पहिल्या डावातलं शतक हा सामन्यातला टर्निंग पॉईंट असल्याचंही शास्त्री म्हणाले. पहिल्या डावातील शतकी खेळासाठी अजिंक्य रहाणेला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *