करोनामुळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ बदल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार असून करोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कोणत्या घोषणा केल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. करोना संकटातून सावरताना विकासाचं ध्येय गाठण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असं असतानाच आज सकाळी अर्थ मंत्रालयामधून संसदेसाठी निघाण्याआधी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बदल करण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली. अर्थमंत्र्याच्या घोषणेमुळे करोनामुळे यंदा अर्थसंकल्प सादर करण्याची पारंपरिक पद्धत मोडीत निघणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

आज सकाळी पावणे नऊच्या सुमारस अर्थमंत्री सीतारामन अर्थ मंत्रलयामध्ये पोहचल्या तेव्हा त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे खाता बही म्हणजेच कागदपत्रं असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप असल्याचं पहायला मिळालं. लाल रंगाचं कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रेचे चिन्हं होतं.

सीतारामन आणि अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी करोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असणार आहे अशी माहिती दिली. या अर्थसंकल्पाची डिजीटल कॉपी ऑनलाइन उपलब्ध असेल असंही सांगण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे. आरोग्यक्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी तरतूद, बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणि मागणीला चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. आर्थिक दृढीकरण आणि १५व्या वित्त आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यावरही भर असेल.

अर्थसंकल्पाचे कागदपत्र हे अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापले जातात. अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक आठवड्याआधी प्रेसमधील कर्मचारी मंत्रालयातच थांबून काम करतात आणि या काळात त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नसतो. यंदामात्र छापील अर्थसंकल्पाऐवजी अर्थसंकल्प डिजिटल माध्यमातून सादर केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *