करोनाविरोधी मोहिमेचा बिहारमध्ये फज्जा; ०००००००००० मोबाईल क्रमांक असणाऱ्या नोंदी सापडल्या

तुम्ही दहा शुन्यांची बेरीज केली तरी ती शुन्यच येते. अनेकदा डेटाबेसमध्ये माहिती उपलब्ध नसेल तर दहा शून्य एन्ट्री म्हणून लिहिले जातात. मात्र बिहारमध्ये करोनासंदर्भातील चाचण्यांच्या माहिती पत्रकामध्ये करोनाची चाचणी झालेल्या व्यक्तींचे फोन नंबर ०००००००००० असे नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

द इंडियन एक्सप्रेसने केलेल्या तपासामध्ये जानेवारी महिन्यामध्ये बिहारमधील जामुई, शिखापुरा आणि पाटण्यामधील सहा केंद्रावर करण्यात आलेल्या करोना चाचण्यांपैकी एकूण ८८५ जणांच्या नावासमोर दहा शून्य हा क्रमांक फोन नंबर म्हणून लिहिण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे करोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा तपास करण्यासाठी त्याचा मोबाईल क्रमांक ही सर्वात महत्वाच्या माहितीपैकी एक असताना असा हलगर्दीपणा समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नियोजित उद्दीष्ट गाठल्याचे दाखवण्यासाठी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी हा फेरफार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच न वापरलेले करोना चाचणीचे कीट लंपास करण्यासाठी खोट्या नावांचा भरणा या चाचणी करण्यात आलेल्या रुग्णांच्या यादीत केल्याचंही बोललं जात आहे.

जिल्हा मुख्यालयामधील डेटा एन्ट्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केंद्रावरील कर्मचाऱ्यांची ही चूक असल्याचं सांगत या प्रकरणासंदर्भात आपले हात वर केलेत. “माहिती पत्रकामध्ये मोबाईल क्रमांक नसल्यास हे फॉर्म गृहित धरले जात नसल्याने केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दहा वेळा शून्य टाकून फॉर्म भरले केले आहेत,” असा दावा जिल्हा मुख्यालयातील कर्मचारी करत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये मोबाईल क्रमांक हा दहा वेळा शून्य असल्याचे दिसून आलं आहे. द इंडियन एक्सप्रेसने तपास केला असता जामुईमधील दोन व्यक्तींचे फोन नंबर ०२०००००००० असे नोंदवण्यात आल्याचंही दिसून येत आहे. अनेकांचे तर फोन नंबर लिहिलेलेच नाहीत असं दिसून येत आहे.

बिहारमधील विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी या बातमीचा फोटो शेअर करत राज्यातील नितीश कुमार सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. बिहारमधील सरकारचा भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा दावा हा ०००००००००० खरा आहे असं तेजस्वी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *