डॉ. धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या (28 जानेवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. स्वत: डॉ धवलसिंह यांनी याला दुजोरा दिला आहे

सुरुवातीला अनेक वर्षे शिवसेनेत राहिलेले डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांची विशेष मर्जी होती. मात्र भाजपच्या साथीला शिवसेनेला राहावे लागल्याने धवलसिंह याना सेनेतून म्हणावा तास न्याय मिळाला नव्हता. यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केल्यावर, डॉ धवलसिंह यांनी शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे सुरु केले होते.

यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह याना गळाला लावलं. त्यांनी गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा जोरदार प्रचार केला आणि लोकसभा निवडणुकीत सव्वा लाखाचे लीड देणाऱ्या मोहिते पाटील यांना भाजपासाठी ही जागा कशीतरी टोकावर निवडून आणता आली होती. मात्र यानंतरही राष्ट्रवादीत धवलसिंह यांना पक्षात दुर्लक्षित केल्याच लक्षात येऊ लागताच त्यांनी थेट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. शिवाय मागील महिन्यात नरभक्षक बिबट्याला मारल्यामुळे त्यांच्या इमेज बिल्डिंगमध्येही मदत झाली होती.

मोहिते विरुद्ध मोहिते ही लढाई त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पिढीतही अखंडपणे सुरु ठेवली होती. विजयसिंह मोहिते पाटील गटाला विरोध करण्याचं काम ते करत होते. सुरुवातीला काही काळ ते शिवसेनेत होते. परंतु शिवसेनेत अपेक्षित जबाबदारी न मिळाल्याने त्यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. अतिशय कमी मतांच्या फरकाने भाजपच्या राम सातपुते यांचा विजय झाला होता. परंतु राष्ट्रवादीतही दुर्लक्षित झाल्याने त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *