भविष्यात भाजपा हा पक्षच उरणार नाही; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचं टीकास्त्र

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्तांतराविषयी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होते. फडणवीसांच्या या विधानाचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. “भविष्यात भाजपा हा पक्षच राहणार नाही,” असं राजकीय भाकित करत त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमी नाना पटोले यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपावर निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले,”देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. पण ते काहीही बोलतात. राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजपा हा पक्षच उरणार नाही,” असा दावा नाना पटोले यांनी केला.

यावेळी पटोले यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दलही भूमिका मांडली. त्याबरोबर सरकारच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींवरही टीका केली. “देशातील सेलिब्रिटींना सरकारच्या बाजूने आता‌ ट्विट करता येतं. पण त्यांना जनतेच्या प्रश्नांवर ट्विट करता येत नाही,” असे म्हणत पटोले यांनी क्रिकेटपटू आणि कलाकारांना सुनावलं.

सिंधुदुर्ग येथे झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासान दिलं नव्हतं, असं स्पष्ट केलं होतं. शाह यांच्या वक्तव्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “भाजपा आणि शिवसेनेत‌ काय बोलणं झालं हे मला माहिती नाही. शाह तब्बल एका वर्षांने बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का?,” असा सवाल पटोले यांनी केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी बाकांवर आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल,” असं फडणवीस म्हणाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *