राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं. राष्ट्रपतींचं भाषण आत्मविश्वास निर्माण करणार होतं. देशाला नव्या दशकातील वाटचालीचा मार्ग दाखवणारं होतं, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. आभार मानतांना पंतप्रधान मोदी यांनी अभिभाषणावर बहिष्कार टाकल्यावरून विरोधकांना चिमटा काढला.
पंतप्रधान मोदी म्हणाले,” मी राष्ट्रपतींचे आभार मानन्यासाठी इथे उभा आहे. राष्ट्रपतींनी केलेलं अभिभाषण आत्मविश्वास निर्माण करणार आहे. देशाला या दशकासाठीचा मार्ग दाखवणारं भाषण होतं. राज्यसभेत १३-१४ तास सदस्यांनी आपले विचार मांडले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. चांगल झालं असतं, जर राष्ट्रपतींचं भाषण ऐकायला असते. लोकशाहीची गरिमा वाढली असती. आपल्या सगळ्यांच्या मनात खंत राहिली नसती की भाषण ऐकलं नाही. पण राष्ट्रपतींचं भाषण इतकं प्रभावशाली होतं की, न ऐकताही सदस्य बरंच बोलले. त्यामुळे या भाषणाचं मूल्य खूप आहे,” असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.
“आज संपूर्ण जग संकटांचा मुकाबला करत आहे. कुणीही विचार केला नसेल की, मानव जातीला अशा कठीण काळातून जावं लागेल. असंख्य संकटांच्या फेऱ्यात राष्ट्रपतींचं भाषण झालं. हे त्यांचं दशकाचं पहिलं भाषण आहे. जेव्हा संपूर्ण जगाकडे बघतो तेव्हा, भारतातील युवा शक्तीकडे जाणवतं की भारत खऱ्या अर्थाने संधींची भूमी आहे. असंख्य संधी आपली वाट बघत आहे. जो देश तरुण आहे. उत्साहाने भरलेला आहे. जो देश अनेक संकल्प करून ते पूर्ण करण्याच्या दिशेने जात आहे. तो देश या संधी कधीही जाऊ देणार नाही,” असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.