विहारी-अश्विनने सामना वाचवला, सिडनी कसोटी अनिर्णित

रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीमुळे भारताला विजयाची आस लागली होती. पण दोघेही बाद झाल्यानंतर सामना वाचवण्यासाठी भारताची धडपड सुरु झाली. परंतु हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या चिवट फलंदाजीमुळे भारताला हा सामना अनिर्णित राखण्यात यश आलं.

हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. आर अश्विनने 130 आणि हनुमा विहारीने 160 चेंडू खेळून काढले. त्यामुळे भारताने या सामन्यात पराभव टाळला. विशेष म्हणजे दुखापत होऊनही हनुमा विहारीने 160 चेंडू खेळला. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या स्वप्नांवर विहारी आणि अश्विन यांनी विरजण टाकलं. परिणामी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.

रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीमुळे विजय दृष्टीक्षेपात होता. विजयासाठी 157 धावांची गरज असताना रिषभ पंत 97 धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा 77 धावांवर माघारी परतला. त्यामुळे विजयाची आस लागलेल्या भारतीय संघाला हा सामना वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. पराभव टाळण्यासाठी भारताला विकेट्स जाऊ न देता उर्वरित षटकं खेळून काढायची होती. हे काम हनुमा विहारी आणि आर अश्विनने फत्ते केलं.

हनुमा विहारी आणि आर अश्विनने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. अश्विनने 39 धावांचं योगदान दिलं तर विहारीने 23 धावा केल्या. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी 40 पेक्षा जास्त षटका खेळून काढली आणि सामना अनिर्णित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *