उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले…

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांचा हा निरोप अजित पवारांना दिला आहे.
 मुंबई: पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे दुखावले आहेत. या पाच नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठवा असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांचा हा निरोप अजित पवारांना दिला आहे. याबाबत आता अजित पवार आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय. दोन दिवस शिवसेना याबाबत वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असणार आहे. जर याबाबत राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर शिवसेना दोन दिवसांनी पुढील भूमिका घेणार आहे.

महाविकास आघाडीत विविध कारणांमुळे वाद वाढत असतानाच, वादाचा हा मुद्दा कसा सुटणार याकडे लक्ष लागलंय.पारनेर नगरपंचायतीमधील  शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती इथं राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हा प्रवेश घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. यात नंदा देशमाने, वैशाली औटी, नंदकुमार देशमुख, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांचा समावेश आहे.

महाविकास आघाडी सरकार एकत्र काम करत असताना राष्ट्रवादीने केलेल्या या कृत्याने उद्धव ठाकरे चांगलेच दुखावले गेले आहेत. सत्तेत एकत्र असताना शिवसेनेला शह देण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न ठाकरे यांना पटलेला नाही. त्यामुळेच त्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवारांना निरोप दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *